Sunday, October 8, 2017

कासव

काल खरे तर योग होता म्हणूनच कासव बघता आला, नाहीतर मुंबई मध्ये अगदी एकाच ठिकाणी प्रयोग चालू आहेत.

अगदी पहिल्या फ्रेम पासून हा सिनेमा खेळवून ठेवतो, आणि जस जसा सिनेमा पुढे सरकत जातो, तितकी ती गोष्ट आणि पात्र अगदी आपल्या सभोवताल ची वाटू लागतात. 

जानकी ने हाती घेतलेले कासव संगोपन आणि निश म्हणजे जणू आपल्यातलाच कोणी नैराश्याने ग्रासलेला आहे आणि जानकी त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे, अशी ही वरवरची गोष्ट.

अलोक राजवाडे ने निश ची भूमिका चोख पार पडली आहे, आधी तर त्याचा राग सुद्धा येतो. पण ज्या सच्चे पणाने त्याने हे पात्र रंगवले आहे त्याला सलाम. इरावती हर्षे आणि मोहन आगाशे ह्यांनी हि उत्तम काम केले आहे. 

तरीही भाव खाऊन आणि मनाला भिडते ते पात्र म्हणजे परश्या. तो ज्या पद्धतीने निश शी संभाषण करतो ते अफलातून जमलं आहे. ते ऐकताना जरी चेहऱ्यावर हसू येत तरी त्यात खोल विचार दडले आहेत.

कासवांच्या बाबतीत जेव्हा मोहन आगाशे सांगतात कि मादी अंडी घालून परत समुद्रात निघून जाते, ती आपल्या बाळांना कधी बघत नाही, कदाचित म्हणून तिच्या डोळ्यात कायम पाणी असते, तेव्हा नकळत आपल्याही डोळ्यात पाणी येते.  

दिग्दर्शन तर उत्तम, कुठेही आणि कुठल्याच क्षणी हे असे का ? असा प्रश्न पडत नाही. 

निश च्या गोष्टीचा आणि कासव संवर्धनाचे काय नेमके होते हे पाहण्यासाठी सुवर्णकमळ विजेता कासव पाहायलाच हवा.